भारतातील क्रांतिकारकांचे विदेशातील कार्य
विद्यार्थीमित्रांनो, आपल्या भारतातील क्रांतिकारांनी आपल्या देशासाठी जे योगदान दिले आहे, ते तुम्हाला वेगळे सांगायची गरज नाही आहे, पण कदाचित आपल्या या भारतातील क्रांतिकारकांचे विदेशातील कार्य तुम्हाला माहिती असेल, म्हणून आजच्या या लेखात मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे भारतातील क्रांतिकारकांचे विदेशातील कार्य.
इंग्लंड देशातील कार्य
1. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा (1857-1930)
श्यामजी वर्मा यांचा जन्म गुजरातमध्ये झाला होता. 1884 साली ते बॅरिस्टर झाले व 1897 साली लंडन येथे स्थायिक झाले. परदेशात शिक्षण घेणाऱ्या 6 भारतीय तरुणांना ते दरवर्षी प्रत्येकी एक हजार रुपयांची शिष्यवृत्ती देत असत, लंडनमधील त्यांचे घर हे क्रांतिकारकाचे केंद्रस्थान बनले होते. 1905 साली श्यामजी यांनी लंडन येथे ‘इंडियन होमरुल सोसायटी’ ची स्थापना केली. ज्याला नंतर इंडिया हाऊस’ असे म्हटले जाऊ लागले. इंडिया हाऊसमार्फतच श्यामजी यांनी ‘इंडियन सोशलॉजिस्ट’ नावाचे मासिक लंडनमध्ये सुरू केले आणि पूर्ण स्वराज्य हे त्यांचे अंतिम उद्दिष्ट होते.

ब्रिटिश सरकारने श्यामजी यांच्या कार्यावर निर्बंध घातले, त्यामुळे त्यांनी परिस येथे स्थलांतर केले. पॅरिसमध्ये देखील त्यांनी क्रांतिकारकांना मदत करण्याचे कार्य सुरू ठेवले. त्यांच्या गैरहजेरीत इंडिया हाऊसची जबाबदारी सावरकर यांनी सांभाळली.
2. 1857 च्या उठावाचा इंग्लंडमधील सुवर्णमहोत्सव
10 मे 1908 रोजी इंडिया हाऊसमध्ये 1857 च्या उठावाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यासाठी भारतीय लोकांची मोठी सभा आयोजित करण्यात आली, परिसमधील सरदारसिंग राणा हे सभेचे अध्यक्ष होते. ‘ओ मार्टरस’ नावाचे एक पत्रकही काढण्यात आले. अयोध्येच्या बेगमने 1857 साली काढलेल्या इंग्रजविरोधी जाहीरनाम्याचे पुनर्प्रकाशन करण्यात आले.
3. 1908 साली लंडनमध्ये पहिला शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. “The grave warning’ नावाची लघु पुस्तिका काढून तिच्या प्रती लंडनमध्ये व भारतात वाटल्या.
4. इंग्लंडच्या भारताविषयक धोरणावर ज्याचा प्रभाव होता, त्या सर विल्यम ली वॉर्नर यांनी ‘निगर’ असे संबोधून केलेल्या अपमानामुळे चिडून जाऊन कुंजविहारी भट्टाचार्य या तरुणाने भर रस्त्यात त्यांच्या श्रीमुखात भडकावली तर ‘सुअर का बच्चा’ म्हटल्याबद्दल वासुदेव भट्टाचार्य या तरुणाने सर साहेबांना भर रस्त्यात काठीचे तडाखे दिले.
5. मदनलाल धिंग्रा (1883-1909) – यांचा जन्म पंजाबमध्ये झाला होता. उपजीविकेसाठी त्यांनी टांगा चालक, मजूर, क्लर्क अशी अनेक कामे केली. 1906 साली पुढील शिक्षणासाठी ते लंडनला गेले. तेथे इंडिया हाऊसच्या क्रांतिकारकांशी त्यांचा परिचय झाला. 1 जुलै 1909 रोजी मदनलाल यांनी भारत सचिवचे राजकीय सल्लागार विल्यम कर्झन वायली याची हत्या केली. यावेळी डॉ. कावसजी लालकाका हे पारशी गृहस्थदेखील धिंग्रा यांच्या गोळीला बळी पडले. 17 ऑगस्ट 1909 रोजी धिंग्रा यांना लंडनच्या पेंटनव्हिले जेलमध्ये फाशी देण्यात आली.
अमेरिका देशातील कार्य
1. लाला हरदयाळ (1884-1939): लाला हरदयाळ यांचा जन्म दिल्ली येथे एका पंजाबी कुटुंबात झाला. हरदयाळ यांचे प्राथमिक शिक्षण दिल्ली येथील केंब्रिज मिशन स्कूलमध्ये झाले. त्यानंतर सेंट स्टिफन्स महाविद्यालय, दिल्ली येथून त्यांनी संस्कृतमधून पदवी शिक्षण घेतले, तर पंजाब विद्यापीठ, लाहोर येथून संस्कृतमध्ये एम. ए. केले.

ब्रिटिश सरकारने त्यांना पदव्युत्तर परीक्षेत मिळविलेल्या उल्लेखनीय गुणांबद्दल 200 पौंड इतकी शिष्यवृत्ती दिली. या शिष्यवृत्तीच्या मदतीने त्यांनी पुढील शिक्षणासाठी 1905 साली ऑक्सफर्ड विद्यापीठ, लंडन येथे प्रवेश घेतला. या विद्यापीठाकडूनही त्यांना आणखी दोन शिष्यवृत्त्या मिळाल्या. महाविद्यालयीन काळात हरदयाळ आर्य समाजाकडे आकृष्ट झाले.
‘यंग मेन्स इंडिया असोसिएशन’ या संघटनेची स्थापना हरदयाळ यांनी केली. या संघटनेचे उद्घाटन प्रसिद्ध कवी मुहम्मद इक्बाल यांनी केले. लंडनमध्ये शिक्षण घेत असताना ते श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या संपर्कात आले. 1907 साली हरदयाळ यांनी लंडनमध्ये देशभक्त समाजाची स्थापना केली.
1908 साली हरदयाळ भारतात परतले. या काळात त्यांनी लाहोर येथील दैनिक पंजाबी या इंग्रजी दैनिकाचे संपादक म्हणूनही काम पाहिले. 1909 साली पॅरिस येथे ते श्यामजी कृष्ण वर्मा व श्रीमती भिकाजी रुस्तुम कामा यांच्या संपर्कात आले. तेथे वंदे मातरम् व तलवार या मासिक पत्रिकांचे संपादन ते करू लागले. पॅरिस येथेच त्यांनी आपले प्रचार केंद्र बनविले. पुढे 1910 साली ते अल्जेरिया येथे गेले. तेथून मार्टिनिक बेटावर जाऊन त्यांनी काही काळ एकांतवास स्वीकारला.
भाई परमानंद यांच्या आग्रहाखातर हरदयाळ हिंदू संस्कृतीच्या प्रसारासाठी अमेरिकेला गेले. तेथे त्यांनी आद्य शंकराचार्य, कांट, हेगेल व कार्ल मार्क्स यांच्या कार्याचा अभ्यास केला. अमेरिकन बुद्धिवादी लोक त्यांना हिंदू संत, कवी म्हणून संबोधित. 1912 साली स्टॅनफर्ड विद्यापीठात ‘हिंदू संस्कृती दर्शन’ या विषयाचे सन्माननीय प्राध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे 25 जून 1913 रोजी ‘गदर पार्टी’ची स्थापना केली. सोहनसिंह भाकना या
पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, तर हरदयाळ हे महासचिव होते. हरदयाळ यांना अटक करण्याविषयीच्या हालचाली ब्रिटिश सरकारने सुरू केल्या तेव्हा ते स्वित्झर्लंडला व तेथून जर्मनीला गेले. हरदयाळ यांना जगातील सुमारे 13 भाषा अवगत होत्या.
1927 पासून हरदयाळ यांनी इंग्लंडमध्ये वास्तव्य केले. त्यांना डॉक्ट्रिन्स ऑफ बोधिसत्त्व या प्रबंधाबद्दल लंडन विद्यापीठाने पीएच. डी. पदवी दिली. हरदयाळ यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले. त्यामध्ये थॉट्स ऑन एज्युकेशन, युगांतर सर्क्युलर, राजद्रोही प्रतिबंधित साहित्य (गदर, ऐलान-ए-जंग, जंग-दा-हांका), सोशल कॉन्केस्ट ऑन हिंदू रेस, फॉर्टी फोर मंथ्स इन जर्मनी अँड तुर्की (1920), स्वाधीन विचार (1922), अमृत में विष (1922), हिट्स फॉर सेल्फ कल्चर (1934), ट्वेल्व्ह रीलिजन्स अँड मॉडर्न लाइफ, ग्लिम्पसेज ऑफ वर्ल्ड रीलिजन्स इत्यादींचा समावेश होतो.
> तत्कालीन भारतातील ब्रिटिश सरकारने त्यांना 1939 साली भारतात येण्याची सहमती दिली. दरम्यान शांततावादाचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने व्याख्यान देण्यासाठी ते फिलाडेल्फिया येथे गेले होते. तेथेच त्यांचे गूढरीत्या निधन झाले.
2. गदर चळवळ
लाला हरदयाळ यांनी सॅन फ्रान्सिस्को येथे 25 जून 1913 रोजी ‘हिंदी असोसिएशन ऑफ अमेरिका’ ही संघटना स्थापन केली व गदर नावाचे साप्ताहिक सुरू केले. रामचंद्र व बरकतउल्ला हे लाला हरदयाळ यांचे साहाय्यक होते. आमचे नाव काय आहे? बंड. हे बंड कुठे होईल? भारतात. अशी सुरुवात गदर या साप्ताहिकाने केली. या साप्ताहिकाच्या नावावरून चळवळीला गदर असे नाव मिळाले. हे साप्ताहिक 1857 च्या उठावाच्या स्मृती जपण्यासाठी चालविले जात होते.
गदर पत्रांच्या मुखपृष्ठावर ‘अंग्रेजी राज का दुश्मन’ असे शब्द होते. हे साप्ताहिक मोफत वितरित केले जात असे. गदर संघटनेने प्रसिद्ध केलेल्या ‘गदर दी गुंज’ या काव्य पुस्तिकेत देशभक्तिपर गीते होती. गदर हे इंग्रजी, हिंदी, उर्दू, बंगाली, मराठी आदी भाषांत प्रकाशित होत असे.
एका वर्षात या संघटनेच्या सदस्यांची संख्या 5000 वर गेली. अमेरिका व कॅनडा येथे मिळून 62 शाखा स्थापन झाल्या. सशस्त्र उठावाच्या मदतीने भारतातील ब्रिटिश सत्ता नष्ट करणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. पहिल्या महायुद्धाच्या काळात गदरने सुमारे 3000 क्रांतिकारक भारतात पाठविले. राष्ट्रीय उठाव घडवून आणण्यासाठी विविध प्रांतांतील क्रांतिकारी लोकांशी संपर्क करणे व शस्त्रे जमविणे हे त्यांचे काम होते.
21 फेब्रुवारी 1915 रोजी भारतामध्ये एकाच वेळी उठाब घडवून आणण्याचा गदरचा प्रयत्न होता. पण सरकारला या कटाचा सुगावा लागला, अनेकांना तुरुंगवासाची शिक्षा झाली, तर 45 जणांना फाशी देण्यात आली. त्यात विष्णू पिंगळे, जगतसिंग, बक्षीससिंग, कर्तारसिंग यांचा सहभाग होता.
कॅनडा देशातील कार्य
1. कॅनडात क्रांतिकारी चळवळ संघटित करण्याचे काम बाबा गुरुदत्तसिंग यांनी केले. ‘कामागाटामारू’ हे जपानी जहाज बाबा गुरुदत्तसिंगने भाड्याने घेऊन काही पंजाबी शीख व मुस्लिमांना घेऊन कॅनडातील व्हॅकुव्हरला जाण्याचा प्रयत्न केला. तेथे जाऊन स्वतंत्र जीवनाचा अनुभव घ्यावा व भारतीय स्वातंत्र्य संग्रामात भाग घ्यावा, हा त्यामागचा उद्देश होता. पण कॅनडाने ते जहाज आपल्या बंदरात उतरू न दिल्याने 27 सप्टेंबर 1914 रोजी परत कलकत्त्याला आले. इंग्रजांच्या दबावामुळे कॅनडाने असे केले होते. बाबाला अटक करण्याचा प्रयत्न केला, पण ते निसटले. इतरांना विशेष रेल्वेगाडीने पंजाबमध्ये पाठविले. या संतप्त लोकांनी स्थानिकांच्या मदतीने पंजाबमध्ये अनेक ठिकाणी दरोडे टाकले. त्यांचे स्वरूप मात्र राजकीय होते.
2. तारकनाथ दास (1884-1958)

तारकनाथ दास यांचा जन्म बंगालमध्ये झाला होता. अमेरिकन प्रशासनात अनुवादक व दुभाषी म्हणून त्यांनी काम केले. पांडुरंग खानखोजे यांच्यासोबत भारतीय स्वतंत्रता लीगची स्थापना केली, तारकनाथ दास यांनी ‘फ्री हिंदुस्थान’ पत्र व ‘तलवार हे नियतकालिक कॅनडात सुरू केले.
जर्मनी देशातील कार्य
वीरेंद्र चटोपाध्याय जर्मनीत क्रांतिकार्याची आखणी करीत होते. धीरेन सरकारच्या नेतृत्वाखाली सप्टेंबर 1914 साली तेथे एक समिती स्थापन झाली. या समितीच्या निमंत्रणावरून लाला हरदयाळ बर्लिनला आले व तेथे त्यांनी ‘इंडियन इंडिपेंडेंस’ समिती स्थापन केली.
अफगाणिस्तान
पठाणांच्या प्रदेशातील भारतीय वहाबी नेत्यांच्या मदतीने भारताच्या वायव्य सीमेवर हल्ला करावा. त्याचवेळी देशातील मुस्लिमांनी उठाव करावा. या कटाचे सूत्रधार मौलवी अचिदुल्ला होते. ते काबूलला गेले. तेथे त्यांना महेंद्र प्रताप व बरकतउल्ला हे दोन क्रांतिकारक मिळाले. डिसेंबर 1915 मध्ये काबूल येथे या क्रांतिकारकांनी स्वतंत्र भारताचे हंगामी सरकार स्थापन केले.
तर मित्रांनो तुम्हाला आता भारतातील क्रांतिकारकांचे विदेशातील कार्य या लेखातून आपल्या भारतीय क्रांतिकारकांनी बाहेर जाऊन कोणते कोणते कार्य केले ते समजले असेल तुमच्या काही शंका असतील खाल्ली कंमेंट करून नक्की विचारा.
Also read